नाशिक : बांधकाम साहित्याची चोरी करुन ती विक्री करण्याच्या तयारी असलेल्या तिघा जणांना पोलिसांनी गजाआड करुन २४ लाखाचा ऐवजही जप्त केला. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने ही कारवाई केली असून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित नितीन ढेरिंगे (रा. पळसे), विनोद मोरे (रा. देवळालीगाव) आणि सुनिल ताजनपुरे (चेहरीगाव) असे अटक केलेल्या संशयित यांची नावे आहे. चेहडी शिवार येथे असलेल्या सीएनजी पेट्रोलपंपासमोर पत्र्याच्या शेडमध्ये बांधकामासाठी साहित्य ठेवण्यात आले होते. या तिघांनी लोखंडे गज व इतर साहित्य चोरी करण्याच्या इराद्याने एमएच १५ एफयू ३०३० क्रमांकाचा मिनी ट्रक हा पत्र्याच्या गाळ्यापुढे उभा करत दुकानातून साहित्य ट्रकमध्ये भरले. यावेळी युनिट दोनच्या पथकाने त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांना संशय आल्याने त्यांनी तिघांना ताब्यात घेतल्यानंतर सर्व प्रकार उघड झाली. यावेळी पोलीसांनी या तिघांकडून २० लाख रुपये किंमतीचा ट्रक, ३ लाख ५० हजार रुपये किंमतीचे ५ टन लोखंडी सळई, कटर, लोखंडी शिडी असा २४ लाख ३ हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला.