इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – हृदयविकाराचा गंभीर आजार असलेल्या ६७ वर्षीय महिलेला अमेरिकेतील पोर्टलँड येथून २६ तासांत चेन्नईला विमानाने नेण्यात आले. भारतातील एरो-मेडिकल इव्हॅक्युएशनचे हे सर्वात मोठे प्रकरण आहे. रिपोर्टनुसार, महिलेची ओळख पटलेली नाही. या महिलेवर अमेरिकेतील पोर्टलँड येथे उपचार सुरू होते. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांना चेन्नई येथील रुग्णालयात हृदय शस्त्रक्रिया करायची होती, त्यामुळे एक कोटींहून अधिक खर्च करून त्यांना एअरलिफ्ट करण्यात आले.
महिलेला घेऊन आलेले विमान आयसीयूने सुसज्ज होते. या महिलेला दोन खासगी विमानांनी चेन्नईला आणण्यात आले. प्रथम तिला पोर्टलँड येथून तुर्की (इस्तंबूल) येथे आणण्यात आले आणि नंतर येथून चेन्नई येथे आणण्यात आले. पहिल्या खाजगी जेटमधील वैद्यकीय पथकात तीन डॉक्टर आणि दोन पॅरामेडिक्स कर्मचारी होते. पोर्टलँडहून आइसलँडमधील रेकजाविक विमानतळावर पोहोचण्यासाठी विमानाला साडेसात तास लागले. तेथे पहिला थांबा घेण्यात आला. तेथे इंधन भरल्यानंतर, विमानाने इस्तंबूलमध्ये दुसरा थांबा घेतला. जिथे वैद्यकीय आणि विमान चालक दल बदलले गेले. यादरम्यान रुग्णावर देखरेख ठेवण्यासाठी बंगळुरूचे एक डॉक्टर अमेरिकेहून विमानात होते.
या महिलेला तुर्कस्तानमधील दुसऱ्या खासगी जेटमध्ये हलवण्यात आले. येथून उड्डाण केल्यानंतर हे विमान चार तासांत तुर्कीतील दियारबाकीर विमानतळावर पोहोचले. त्यानंतर मंगळवारी सकाळी विमानाने चेन्नईसाठी उड्डाण केले. विमानातील रुग्णाला ताबडतोब रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवण्यात आले. जिथे तिच्या शस्त्रक्रियेची तयारी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेत हृदय शस्त्रक्रियेसाठी बराच वेळ लागला. याशिवाय, भारतात एअरलिफ्ट करण्यापेक्षा यात गुंतलेला पैसा जास्त होता. त्यामुळे कुटुंबियांनी महिलेवर चेन्नईत उपचार करण्याचा निर्णय घेतला.
Critical Patient Airlift from USA to Chennai Expenses