विशेष प्रतिनिधी, पुणे
शहरातील एका सराईत गुन्हेगाराची हत्या झाल्यानंतर अंत्ययात्रेसाठी सुमारे १२५ बाईक्सची रॅली काढण्यात आली. यावेळी कोरोना संबंधी नियमावलीचे उल्लंघन केल्यामुळे पुणे पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत बाईक रॅली काढणाऱ्या ८० जणांना ताब्यात घेतले आहे.
पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरवरील माधव वाघाटे हा एक सराईत गुन्हेगार होता. वाघाटे याच्या विरूद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याला तडीपारही करण्यात आले होते. व्हॉट्सअॅप स्टेटसवरुन झाल्याने वादानंतर टोळक्याने त्याची हत्या केली.
पुण्यातील बिबवेवाडी भागात वाघाटे याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर शनिवारी दुपारी त्याच्या अंत्ययात्रेत सुमारे २०० जणांनी सहभाग घेत दुचाकी १२५ जणांनी बाईक रॅली काढली होती. यापैकी ८० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. शिवाय त्यांच्या दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहेत.
या प्रकरणी १० जणांविरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाण वाढत आहे. प्रशासकीय पातळीवर आणि पोलिसांकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न जात आहे. त्यातच सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीला बाईकची रॅली काढल्याने संताप व्यक्त केला जात असून कडक कारवाईची मागणी होत आहे.