नवी दिल्ली – कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टरवर गोळीबार केल्या प्रकरणी दोन आरोपींचे चित्र फेसबुकवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यांचे ठिकाणी सांगणाऱ्यांना २२ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध करण्यात आलेल्या चित्रामध्ये आरोपीचा चेहरा फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्गच्या चेहऱ्याशी मिळता-जुळता आहे. हे चित्र २८ फेब्रुवारीला फेसबुकवर अपलोड केल्यानंतर हजारो लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. चित्र पाहून मार्क झुकरबर्ग यांच्यावर विनोदही सुरू झाले आहेत.
कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष इवान ड्यूक शुक्रवारी ज्या हेलिकॉप्टरमधून जात होते, त्यावर गोळीबार करण्यात आला होता. हेलिकॉप्टरमध्ये कोलंबियाचे संरक्षणमंत्री, गृहमंत्री आणि एका राज्याचे गव्हर्नरही उपस्थित होते. पोलिसांनी तपासात काही संशयितांची ओळख पटवली आहे. संशयितांना पाहणाऱ्यांकडून माहिती घेऊन एका चित्रकाराकडून दोन स्केच काढण्यात आले आहेत.
संशयितांना जेरबंद करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन पोलिसांनी करत चित्र फेसबुकवर व्हायरल केले आहे. संशयितांची ओळख पटवून ठिकाणी सांगणार्यांना २२ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. चित्रातील संशयिताचा चेहरा मार्क झुकरबर्गसारखाच असल्याने ते चांगलेच व्हायरल झाले आहे.