इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – असे म्हणतात की, ‘प्रेम हे आंधळे असते!’ ते कोणावरही होऊ शकते. आजच्या काळात अनेक तरुण-तरुणी प्रेम विवाह करतात. त्यावेळी जात किंवा धर्म यासारखी सामाजिक बंधने त्याच्या आड येत नाहीत. परंतु अद्यापही अनेक समाजामध्ये पारंपारिक रूढी, प्रथा, परंपरामुळे समाजातील विचार मागासलेले दिसतात. त्यातूनच मग एखाद्या जोडप्याने प्रेम विवाह केला आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय प्रेम विवाह केला तर त्याला प्रचंड विरोध होतो, इतकेच नव्हे तर त्यात त्या तरुणाच्या किंवा तरुणीचा जीव देखील घेण्यात येतो, अशा प्रकारच्या घटना गेल्या काही दिवसात देशभरात अनेक ठिकाणी घडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे
गुजरातच्या राजकोटमध्ये नुकतीच हैदराबादसारखी घटना घडली आहे.
काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये एका तरुणाची रस्त्याच्या मधोमध हत्या करण्यात आली होती. त्याचा दोष एवढाच होता की, त्याने दुसऱ्या धर्माच्या मुलीशी लग्न केले होते. आता असाच एक प्रकार राजकोटमध्ये समोर आला आहे. याठिकाणी २२ वर्षीय तरूण मिथुन ठाकूर याला बेदम मारहाण करण्यात आली. त्याचाही दोष हा होता की तो १८ वर्षीय सुमैया कडीवार हिच्यावर प्रेम करत होता.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मूळचा बिहारचा रहिवासी असलेला मिथुन ठाकूर राजकोटमध्ये राहत होता आणि एका स्थानिक कारखान्यात काम करत होता. जंगलेश्वर मेनरोडवर असलेल्या राधाकृष्ण सोसायटीत तो राहत होता. याच सोसायटीत सुमैया कडीवार ही तरूणी देखील राहत होती. गेल्या काही महिन्यांपासून दोघांचे प्रेमप्रकरण सुरू होते. दोघांमध्ये प्रेम वाढले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
सोमवारी मिथुन ठाकूरने सुमैयाला फोन केला. सुमैयाचा भाऊ साकीर याने हा फोन उचलला. यानंतर दोघांमध्ये खूप भांडण झाले. काही वेळातच साकीर इतर तिघांसह मिथुनच्या घरी पोहोचला. यानंतर सर्वांनी मिळून मिथुनला मारहाण केली.
मारहाणीनंतर साकीर मिथुनच्या घराबाहेर पडला. शेजाऱ्यांनी मिथुनला बेशुद्धावस्थेत पाहिले असता त्याला रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यापुर्वीच ब्रेन हॅमरेजमुळे त्यांचा मृत्यू झाला. हा प्रकार सुमैयाला समजल्यानंतर तिनेही हाताचे मनगट कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर सुमैयालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.