इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगातील बहुतांश देशांमध्ये बलात्काराबाबत अतिशय कठोर नियम बनवले गेले आहेत. अनेक देशांमध्ये बलात्काराच्या दोषींना कठोर शिक्षा देण्याबाबत बैठका घेतल्या जात आहेत. दरम्यान, पेरूच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या एका विधानाने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. बलात्काराच्या दोषींना नपुंसक बनवण्यात येणार असून त्यासाठी रसायनांचा वापर करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
पेरूचे राष्ट्राध्यक्ष पेड्रो कॅस्टिलो म्हणाले की, पेरुव्हियन सरकार एक विधेयक तयार करत आहे ज्यात बलात्काऱ्यांना नपुंसक बनवण्याविषयी कारवाई केली जाईल. रोया न्यूजने अधिकृत पेरुव्हियन स्त्रोतांच्या माहितीनुसार एका वृत्तात याबाबत तपशीलवार माहिती स्पष्ट केली आहे. पेरूचे अध्यक्ष कॅस्टिलो म्हणाले की, याबाबतचा प्रस्ताव येत्या काही दिवसांत औपचारिकपणे समोर आणला जाईल. हे विधेयक कार्यकारी मंडळ तयार करत आहे. बलात्कारी लोकांना नपुंसर बनवण्यासाठी रासायनिक औषधांचा वापर करण्यात येणार असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांत पेरु देशात बलात्काराच्या अनेक भीषण घटना समोर आल्यानंतर पेरूच्या राष्ट्राध्यक्षांनी हा निर्णय घेतला आहे. ही घोषणा करतानाही राष्ट्राध्यक्ष कॅस्टिलो यांनी एका तीन वर्षांच्या मुलीच्या प्रकरणाचा संदर्भ दिला. त्यानंतर देशातील बलात्कार्यांविरुद्धचा रोषही समोर आला होता. या प्रकरणावर, पेरूच्या कायदेमंत्र्यांनी सांगितले की, बलात्कारासारख्या घटना होऊच नये म्हणून असे तीव्र निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. पेरूपूर्वी हा नियम दक्षिण कोरिया, पोलंड, झेक प्रजासत्ताक आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाच्या काही राज्यांमध्ये लागू आहे. सध्या पेरूच्या राष्ट्राध्यक्षांनी याबाबत घोषणा केल्याने पेरूमध्ये वादही निर्माण झाला आहे. काही लोकं त्यांना समर्थन देत असले तरी काही तज्ज्ञांना अजूनही यावर चर्चा करण्याची गरज वाटत आहे. त्यामुळे अद्याप या निर्णयावर शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. पण या निर्णयामुळे बलात्काराच्या घटनांना चाप बसेल असा विश्वासही अनेकांकडून व्यक्त केला जात आहे.