इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आजच्या काळात यश, कीर्ती, पैसा या प्रत्येक मनुष्याला आवश्यक वाटणारी गोष्ट झाली आहे. परंतु सन्मार्गाने मिळवलेला पैसा असो की, यश कायमस्वरूपी असते. परंतु काही व्यक्ती पैसा, प्रतिष्ठा किंवा पदासाठी वाटेल ते करायला तयार होतात. अगदी दुसऱ्याचा जीव घेण्यासाठी देखील काही जण मागे पुढे पाहत नाहीत, अर्थात याचा परिणाम चांगला होत नसतो. उत्तर प्रदेशात एका महिला प्राध्यापकेने प्रतिष्ठित पदाच्या हव्यासापायी आणि एका संस्थेचे प्रमुख बनण्यासाठी त्या पदावरील एका व्यक्तीचा हत्येचा कट रचला या प्रकरणामुळे सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे.
प्राध्यापक आरती यांना मेरठ येथील सरदार वल्लभभाई पटेल कृषी विद्यापीठाच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डीन व्हायचे होते. त्यासाठी त्यांनी डीन डॉ. राजवीर सिंग यांच्या हत्येचा कट रचला. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांचे पथक आरोपी महिला प्राध्यापक आणि दुसऱ्या शूटरचा शोध घेत आहे. अनेक ठिकाणी छापे टाकले, पण कोणी समोर आले नाही. मात्र या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी महिला प्राध्यापकाच्या प्रियकर व मुख्य शूटरसह अन्य एकाला अटक केली आहे.
कृषी विद्यापीठाचे पशुवैद्यकीय डीन डॉ. राजवीर सिंग यांच्यावर दि.11 मार्च रोजी हल्ला झाला होता. याच विभागात कार्यरत असलेल्या प्राध्यापिका आरती भाटेले यांनी तिच्या प्रियकरासह डीनच्या हत्येचा ठेका दिल्याचा खुलासा पोलिसांनी केला.
प्रा. आरती यांना स्वतः डीन व्हायचे होते आणि म्हणून डॉ. राजवीर यांना संपवण्याची योजना आखली. या प्रकरणी पोलिसांनी प्रोफेसर आरतीचा प्रियकर अनिल बालियान, विक्रेता मुनेंद्र बाना आणि उधम सिंग गँगचा शूटर आशु यांना अटक केली.
विशेष म्हणजे आरोपी प्राध्यापक आरती आणि दुसरा शूटर नदीम अद्याप फरार असून त्यांच्या शोधात छापे टाकले जात आहेत. पोलिसांनी आरतीच्या जवळच्या लोकांची चौकशी केली असून ती कुठे लपली असावी हे जाणून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नदीमच्या नातेवाईकांवरही छापे टाकले जात आहेत.