पाटणा – चोरांनी देखील अलीकडे चोरीचा पॅटर्न बदललेला दिसतो आहे. बिहारची राजधानी पाटणामध्ये नुकतीच चोरीची अशी एक घटना उघडकीस आली आहे. फॉर्मल कपडे घालून आलेल्या या चोराने केवळ 15 मिनिटांत एका घरातून तब्बल 58 लाखांचा माल लंपास केला.
दिघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आशियाना दिघा मार्गावरील सूर्य दिघा कंपाउंड अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सुमित कुमार शर्मा यांच्या घरी ही चोरी झाली. दिवसाढवळ्या घरात शिरलेल्या या चोराने 55 लाखांचे दागिने तर 3 लाखांची रोख रक्कम पळवून नेली.
सुमित यांची पत्नी सरकारी अधिकारी आहे. सकाळी दहा, साडे दहाच्या आसपास हे दोघे कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडले. मात्र, थोड्या वेळाने सुमित यांच्या शेजाऱ्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडल्याचे त्यांना फोनवरून कळवले. त्यामुळे ते तातडीने घरी आले. पाहतात तर सगळं सामन इथे तिथे पसरलेलं दिसलं. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे.
विशेष म्हणजे या चोराचा चेहेरा सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. त्याच्या हातात एक्झिक्युटिव्ह बॅग दिसते आहे. दुपारी दीडच्या सुमारास तो घरात शिरला आणि अवघ्या 15 मिनिटात त्याने 58 लाखांचा माल लंपास केला. या सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने चोराचा शोध सुरू आहे.
तशाच पद्धतीने आणखी एक चोरी
सुमित कुमार शर्मा यांच्या घरी चोरी झाल्यानंतर तशाच प्रकारची आणखी एक चोरी करण्यात आली. त्यांच्याही घरून दागिने पळवण्यात आले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता, सुमित कुमार आणि ही चोरी एकाच माणसाने केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता शोध सुरू आहे.