इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – त्रिपुरामध्ये एका ४२ वर्षीय महिलेने आपल्या ५o वर्षांच्या पतीचा शिरच्छेद केला आणि मुंडके मंदिरात अर्पण केले. महिलेने असे का केले? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र तिच्या मुलाने पोलिसांना सांगितले आहे की, आई आयुष्यभर शाकाहारी होती, मात्र घटनेच्या आदल्या रात्री तिने चिकन खाल्ले आणि सकाळी ही घटना घडून आली. मात्र सदर महिला मानसिकदृष्ट्या आजारी असल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.
खोवाई जिल्ह्यातील इंदिरा कॉलनी गावात महिला आणि तिचे कुटुंब राहतात. मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. या कुटुंबात दोन अल्पवयीन मुले आहेत. या घटनेची माहिती एका मुलाने पोलिसांना दिली. प्राथमिक चौकशीत मुलाने सांगितले की, माझी आई नेहमीच शाकाहारी आहे. पण काल रात्री त्याने चिकन खाल्ले आणि त्यानंतर आम्ही सर्व झोपी गेलो. सकाळी अचानक जाग आली आणि वडिलांचा शिरच्छेद केल्याचे दिसले. माझी आई रक्ताने माखलेली दाओ म्हणजे तीक्ष्ण शस्त्र घेऊन उभी असलेली पाहून मला धक्काच बसला.आम्ही आरडाओरडा केला तेव्हा ती खोलीतून बाहेर आली आणि माझ्या वडिलांचे डोके घराजवळ बांधलेल्या मंदिरात ठेवले.
या मुलाने पुढे सांगितले की, त्याची आई मानसिक आजारी होती आणि गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. या घटनेनंतर महिलेने स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले, तिथून पोलिसांनी तिला अटक केली. पोलीस अधीक्षक चक्रवर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र सदर महिला मानसिक आजारी होती आणि अलीकडेच एका तांत्रिकाने तिच्यावर उपचार केले होते. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी भेट देऊन पुरावे गोळा केले आहेत. अधिक तपास सुरू आहे.