इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रुग्णाची सेवा करण्याची आणि रुग्णाची काळजी घेण्याची जबाबदारी आरोग्यसेवकांवर असते. पण विकृतीला विशिष्ट्य ठिकाण नसते. ती कुठेही वास करू शकते. याची प्रचिती देणारी घटना अलीकडेच केरळमध्ये घडली. एका वॉर्डबॉयने महिलेवर रुग्णवाहिकेतच बलात्कार केला आणि पळून जाण्याचा प्रयत्नही केला. केरळमधील त्रिशूर वैद्यकीय महाविद्यालयात संबंधित महिलेला रुग्णवाहिकेने नेत असताना ही घटना घडली.
बलात्काराच्या घटनांमध्ये देशात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. कायदे कडक केले, पोलिसांनी वचक ठेवला आणि महिला सतर्क झाल्या तरीही विकृत मानसिकता अश्या घटनांसाठी कारणीभूत ठरतेच. कोडंगल्लूर रुग्णालयात ही महिला भरती होती. पण तिथे तिच्या तब्येतीत मुळीच सुधारणा झाली नाही, त्यामुळे तिला त्रिशूर वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्याचा निर्णय झाला. त्यासाठी रुग्णवाहिका बोलावण्यात आली आणि महिलेसोबत एक वॉर्डबॉयही देण्यात आला.
रुग्णवाहिका त्रिशूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या दिशेने निघाली असताना वॉर्डबॉयने महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केला तरीही वॉर्डबॉयने जुमानले नाही आणि तिच्यावर बलात्कार केला. महिलेने त्रिशूर येथील रुग्णालयात दाखल झाल्यानंतर घडलेला प्रसंग एका परिचारिकेला सांगितला. परिचारिकेने वेळ न दवडता लगेच डॉक्टरांना याची माहिती दिली. डॉक्टरांनी पोलिसांना बोलावून घेतले व पीडितेचे बयाण नोंदविण्यात आले. दरम्यान आरोपी वॉर्डबॉयने पळण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याला अटक केली आणि गुन्हा नोंदवला.
महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
संबंधित महिलेने यापूर्वी वीष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण तिला वेळीच रुग्णालयात भरती करण्यात आल्याने तिचे प्राण वाचले. मात्र तब्येतीत फारशी सुधारणा न झाल्याने त्रिशूरला हलविण्यात येत होते. आत्महत्येतून तर तिचा जीव वाचला पण समाजातील विकृत मानसिकतेने तिच्या आयुष्यावर कायमचा डाग लावल्याची खंत व्यक्त होत आहे.
कोरोनाग्रस्त तरुणीवर अत्याचार
कोरोना काळात कोट्ययम (केरळ) येथे रुग्णवाहिका चालकाने तरुणीवर बलात्कार केला होता. ही तरुणी कोरोनाग्रस्त होती आणि तिला रुग्णालयात भरती करायला नेत असताना चालकाने हे कृत्य केले होते. त्यामुळे एकट्या महिलेला रुग्णवाहिकेतून नेले जाणार नाही असे आदेशच सरकारने काढले होते.
अंघोळ करतानाचे फोटो
हिंगोली येथे एका विवाहितेचे अंघोळ करतानाचे फोटे व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. पीडितेने पोलिसांत तक्रार केल्यामुळे आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरापासून फोटो व्हायरल करण्याची धमकी तो महिलेला देत होता.
Crime Ward Boy Rape on Women in Ambulance