इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राजस्थानच्या अजमेरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका सरकारी शाळेत चौथीच्या विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. उपमुख्याध्यापकाने नऊ वर्षांच्या चिमुरड्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यामुळे निष्पापाच्या डोळ्यात खोलवर जखम झाली. मारहाणीमुळे आता या चिमुरड्याला अस्पष्ट दिसू लागले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिजयनगरच्या संजय नगरमध्ये राहणारे शंभू सिंह यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचा नऊ वर्षांचा मुलगा पंकज सिंह चौहान हा सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात चौथीच्या वर्गात शिकतो. वर्ग सुटल्यानंतर तो शौचालयाकडे जात होता. यादरम्यान शाळेचे उपमुख्याध्यापक संजयकुमार जोशी यांनी त्यांला बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे मुलाचा डोळा सुजला. त्याला आता अस्पष्ट दिसत आहे.
पीडित मुलाने शिक्षकांना विचारल्यानंतर शौचालयात जात असल्याचे सांगितले. वर्गातील इतर मुले गुंडगिरी करत होती. त्याचवेळी उपमुख्याध्यापक संजयकुमार जोशी तेथे पोहोचले. त्यांनी चिमुरड्याला मारहाण केली. जोशी यांनी बोटात अंगठी घातली होती. हीच अंगठी चिमुरड्याच्या डोळ्याला लागली. आता त्याला अस्पष्ट दिसत आहे. मुलाला जेएलएन रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले.
उपमुख्यध्यापकाने सांगितले की, मुले आपापसात भांडत होती. मी गेल्यावर ते मूल खाली पडलेले होते. ज्यामुळे त्याला दुखापत झाली. माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. उपमुख्याध्यापकावर कारवाई करण्याची मागणी वडिलांनी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. विद्यार्थ्याची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत जालोरच्या सुराणा गावातील नऊ वर्षांच्या इंद्रा मेघवालचा शिक्षकाच्या मारहाणीमुळे मृत्यू झाला. इंद्र सरस्वती विद्या मंदिर शाळेत तिसरीच्या वर्गात शिकत असे. मुलाने शाळेत ठेवलेल्या भांड्यातून पाणी प्यायले. त्यावर शिक्षक छैलसिंग यांनी त्याला मारहाण केली. अखेर त्याला गंभीर अवस्थेत उदयपूर आणि अहमदाबाद येथे नेण्यात आले. 24 दिवसांच्या उपचारानंतरही त्यांचा जीव वाचू शकला नाही. अखेर शनिवारी सायंकाळी मुलाचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली. मागासवर्गीय मुलगा असल्याचे सांगत या प्रकरणावरुन जोरदार राजकारण सुरु आहे.
Crime Vice Principle Beaten Student 9 year Old
Rajasthan Ajmer Education