इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कुटुंब किंवा परिवार म्हटला की, त्यात थोडेफार वाद-विवाद आणि भांडण हे होतच असतात. परंतु काही वेळा या भांडणाचे रुपांतर हाणामारी सारख्या प्रकारातही होते. रागाच्या भरात एखाद्याच्या हातून विपरीत घटनाही घडते. अशाच प्रकारे क्रूरपणाचा कळस गाठणारी एक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. घरगुती वादातून काकाने अल्पवयीन पुतण्याला ठार केले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. लखनऊच्या मोहनलालगंजमध्ये किरकोळ झालेल्या वादातून मद्यधुंद सावत्र काकाने आपल्या १८ महिन्यांच्या पुतण्याला रस्त्यावर बेदम मारहाण केली. कुटुंबियांनी या बालकाला तातडीने खासगी रुग्णालयात नेले पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी आरोपी काकाला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीसांनी सांगितले की, मोहनलालगंज मधील रहिवासी डॉ. अमित वर्मा हे क्लिनिक चालवतात. त्याच्या वडिलांनी दोन लग्न केले होते. ते घराच्या पहिल्या मजल्यावर राहतात. त्याचवेळी त्यांचा सावत्र भाऊ मनीष हा जवळच राहतो. मनीष दुचाकीवरून धावत आला. अमितचा मुलगा अयांशकडे गेला. अयांश हा एका खोलीत झोपलेला होता. अयांशला घेऊन मनीष तातडीने खोलीबाहेर आला. मोटरसायकलवरून त्याने अयांशला रायबरेली हायवेवर नेले. तेथे त्याला बेदम मारहाण केली. अयांशचे डोके त्याने रस्त्यावर जोरदार आदळले. निष्पाप चिमुरडा जिवाच्या आकांताने विव्हळत होता आणि निर्दयी मनीष लहानग्या अयांशला उचलून जमिनीवर आपटत होता. हा क्रूरपणा पाहून रस्त्याने जाणाऱ्यांनी आरडाओरडा केला, त्यानंतर आरोपी मनिष पळून गेला. घरी जाऊन तो लपला. त्यानंतर अयांशला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
पोलीस मनिषच्या घरी पोहचले. त्यावेळी मनीष बेडवर आढळून आला. पुतण्याला ठार मारल्याचा कोणताही पश्चाताप त्याच्या चेहऱ्यावर नव्हता. डॉ. अमित यांच्या म्हणण्यानुसार, मनीषने ड्रग्ज घेतले. त्यामुळे मी त्याला वाईट पद्धतीने बोललो. तसेच थोडी शिवीगाळही केली. त्याचा राग आल्यानेच मनीषने अयांशची हत्या केली. सावत्र भावानेच मुलाची हत्या केल्याने पिता डॉ. अमित आणि माता संगिता वर्मा हे शोकसागरात बुडाले आहेत. या अमानुष कृत्याबद्दल कुटुंबात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच परिसरांमध्ये खळबळ उडाली असून तीव्र संताप व्यक्त होत आहे.