इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पैशाचा वा संपत्तीचा काही जणांना इतका लोभ असतो की, त्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. वेळप्रसंगी ते आपल्या नातेवाईकांचा खून देखील करू शकतात. अशा प्रकारच्या घटना देशभरात अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत. केरळमध्ये देखील एका महिलेने संपत्तीसाठी आपल्या कुटुंबातील लोकांचा बळी घेतला, या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती.
केरळच्या महिलेने सिरीयल किलरने 14 वर्षात आपल्याच कुटुंबातील 6 जणांची हत्या केली होती. या खुनांच्या शोधा मागे अनेक वर्षे पोलीस तपासात गुंतले होते, मात्र खुनी अखेर घरातच सापडला. जॉली अम्मा जोसेफ नावाच्या महिलेने तिच्या पतीसह कुटुंबातील सहा सदस्यांना मारण्यासाठी सायनाइडचा वापर केला.
केरळमधील कोझिकोड जिल्ह्यातील एका गावात पोन्नमट्टम कुटुंबातील सहा सदस्य वेगवेगळ्या अकाली संशयास्पद परिस्थितीत मृत आढळले. तिच्या पती रॉय थॉमस यांच्या अमेरिकेत राहणार्या भावाने पोलिसांच्या चौकशीत हा मुद्दा उपस्थित केल्यावर जॉलीची पोल उघड झाली. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा जॉली अम्मा संशयाच्या भोवऱ्यात आली. याआधीही जॉली अम्मा यांच्यावर कुटुंबीयांनीही शंका उपस्थित केल्या होत्या, कारण मृत्यूच्या वेळी त्या प्रत्येक वेळी घरात हजर होत्या. सखोल चौकशी केली असता, जॉली अम्मा जोसेफने 2019 मध्ये कबूल केले की, तिने 2002 ते 2016 दरम्यान कुटुंबातील सहाही सदस्यांना सायनाइड दिले होते. या मृतांमध्ये तिच्या पतीचाही समावेश आहे. तिला संपूर्ण कुटुंबाची संपत्ती हडपायची होती आणि त्यासाठी काही बनावट कागदपत्रेही बनवली होती.
सन 2002 मध्ये जॉलीची पहिली बळी तिची सासू अनम्मा थॉमस ठरली असल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर 2008 मध्ये जोलीने तिचा सासरा टॉम थॉमसची हत्या केली आणि तीन वर्षांनंतर 2011 मध्ये तिचा पती रॉय थॉमसला सायनाइड देण्यात आले. 2014 मध्ये अनामाचे दोन भाऊही मृतावस्थेत सापडले होते. सीरियल किलर जॉली इतका क्रूर झाला होता की तिने नातेवाईकाच्या दोन वर्षांच्या चिमुरडीलाही सोडले नाही आणि 2014 मध्येच तिची हत्या केली आणि त्यानंतर 2016 मध्ये मुलाच्या आईची हत्या केली.
जॉलीच्या शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इतक्या खुनानंतरही ती खूप शांत आणि सरळ दिसत होती, मात्र पोलीस तपासात तिने गुन्ह्याची कबुली दिल्याने सर्वांनाच धक्का बसला. या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा तपास केरळ पोलिसांच्या एसआयटी पथकाने केला होता, ज्यांनी असा दावा केला होता की, जॉलीला वेळीच अटक झाली नसती तर तिने आणखी खून केले असते. जॉली जोसेफच्या खुलाशांची माहिती देताना तत्कालीन पोलीस अधीक्षक के.जी. सायमनने सांगितले की, ती एनआयटीमध्ये शिक्षिका आहे हे सर्वांना माहीत होते, परंतु प्रत्यक्षात ती ब्युटी पार्लर चालवत असे. याशिवाय मालमत्ता मिळवण्यासाठी त्यांनी बनावट इच्छापत्रही केले होते. तत्कालीन पोलीस अधीक्षकांच्या म्हणण्यानुसार, जॉलीला मालमत्तेसह संपूर्ण कुटुंबावर नियंत्रण हवे होते, त्यासाठी त्याने हे खून केले होते. ओळखीच्या काही जणांनी जॉलीला सायनाइड पुरवण्यात मदत केली.