कल्याण (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एखाद्या घरात चोरी किंवा घरपोडी झाली तर त्यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने मौल्यवान वस्तू किंवा पैसे अशा प्रकारचे लंबास करतात. परंतु एका चोरीमध्ये चोरट्यांनी मौल्यवान वस्तू तथा ऐवजाला हात लावण्या ऐवजी वेगळ्याच वस्तूंवर डल्ला मारला. याबद्दल आता डोंबिवली शहरात उलट सुलट चर्चा सुरू असून पोलीस देखील विचारात पडले आहेत.
डोंबिवली पश्चिम येथे एक अनोखी चोरी घडली आहे. या चोरीत चोरट्यांनी घरातील मौल्यवान वस्तू सोडून स्नानगृह, स्वच्छतागृह, आणि किचनमधील असे 16 नळ काढून लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. डोंबिवली पश्चिमेकडील शिवनेरी सोसायटीत ही घटना घडली आहे. याप्रकरणी घर मालक किशोर भाऊसाहेब जोंधळे यांच्या तक्रारीनंतर विष्णुनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.
चोरट्याने घरात घुसून मौल्यवान वस्तू चोरण्याऐवजी केवळ नळ चोरल्याने पोलीसही आश्चर्यचकित झाले असून, चोरटे प्लंम्बर असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. डोंबिवली पश्चिम भागातील शिवनेरी सोसायटीत किशोर भाऊसाहेब जोंधळे हे कुटुंबासह राहतात. जोंधळे कुटुंब दि. 28 जुलै ते 7 ऑगस्ट यादरम्यान काही कामनित्ताने बाहेरगावी गेल्याने घराला कुलूप होते. त्यानंतर, दोन दिवसांपूर्वी घरी परतल्यानंतर त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप कोयंडा तुटल्याचे दिसताच त्यांना घरात चोरी झाल्याचा संशय आला.
कुटुंबियांनी घरात जाऊन पाहिले तर घरातील साहित्य चोरट्याने अस्ताव्यस्त फेकून दिले होते. मात्र कुठलीही वस्तू चोरीला गेली नव्हती. जोंधळे यांनी आश्चर्यचकित होऊन घरामध्ये पुन्हा एकदा पाहणी केली. यावेळी त्यांची नजर घराच्या स्वच्छतागृह, स्नानगृह आणि किचनमध्ये लावलेल्या नळाकडे गेली असता, हे नळ चोरट्यांनी लंपास केल्याचे त्याच्या लक्षात आले. नळ चोरल्याने पोलीसांनीही आश्चर्य व्यक्त केले. या नळांची किंमत सुमारे 31 हजाराची असून, याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करत चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. या परिसरात या आगळ्यावेगळ्या चोरीबद्दल उलट सुलट चर्चा सुरू आहे.
Crime Theft Police Family Shocked Stolen
16 Water Taps Investigation Dombivali Mumbai