इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेल्या दोन वर्षांपासून बिहारमध्ये गुन्हेगारी मध्ये प्रचंड वाढ झाली आहे. खून, दरोडे आणि चोरीच्या घटना तर अनेक शहरांमध्ये सर्रासपणे सुरू आहेत. मोतिहारी शहरातील मिसकॉट परिसरातून पाच दुचाकीस्वारांनी सराफी कारागिराच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून तब्बल एक किलो आठशे ग्रॅम सोने लांबवले. ज्वेलरी कारागीर आलोक कुमार हे मिसकॉट येथील सोने पॉलीश करण्यासाठी दुसऱ्या दुकानातून सोने घेऊन जात होते. त्याचवेळी ही घटना घडली.
ही घटना सायंकाळी 5.30 वाजता घडली आणि पोलिसांना रात्री 8 च्या सुमारास कळविण्यात आले. ज्वेलरी कारागीर आलोक कुमारचा भाऊ त्रिलोकी कुमार सांगतात की, आलोक त्याच्या शेजारच्या दुकानातून सोने घेऊन ते स्वच्छ पॉलीश करायला गेला होता. दुचाकीवरून परतत असताना मिसकॉट लोकलमध्ये दोन दुचाकीस्वार तरुणांनी त्याच्या डोळ्यात मिरचीपूड फेकली. दरम्यान, त्यांच्या बॅगेतील सोने काढून चोरट्यांनी पळ काढला. त्याचवेळी एका तरुणाने त्याला रडताना पाहून विचारले, काय झाले? तेव्हा त्यांच्या बॅगेतील दागिने चोरट्याने हिसकावून घेतल्याचे सांगितले. दरम्यान तेथे अनेक नागरिक जमा झाले. तोपर्यंत आलोक पुन्हा दुकानाकडे परतला आणि डोळे धुवून त्या दुकानात गेला, जिथून त्याने सोने घेतले होते. दुकानदार आलोकला अज्ञात ठिकाणी घेऊन गेला असून त्याची चौकशी करत आहे. पोलिस निरीक्षक विजय प्रसाद राय यांना माहिती मिळताच चौकशी सुरू केली आहे. या घटनेने मात्र बाजारपेठेत चांगलीच खळबळ उडाली आहे.