औरंगाबाद – कोरोनाच्या संकटामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींची उपासमार झाली तर काही देशोधडीला लागले. त्यामुळेच गेल्या काही महिन्यांपासून राज्यात भुरट्या चोऱ्यांपासून विविध प्रकारचे गुन्हे वाढत आहेत. सराईत नसणारे चोर त्यांच्यापरीने चोरीचा प्रयत्न करतात पण त्यांना एक चूक महागात पडते. त्याचाच प्रत्यय येथे आला आहे.
सराईत चोर हे अतिशय चपखलपणे चोरी करतात आणि चोरी झाल्यानंतर कुठलाही पुरावा मागे सोडत नाहीत. एका चोराने मात्र मोठी चूक करत सर्व गडबड केली. पोलिसांना मात्र ही बाब फायदेशीर ठरली आहे. एक चोर बेगमपुरा पोलिस स्टेशनच्या परिसरात चोरीसाठी मध्यरात्री फिरत होता. त्याने एका घरात शिरकाव केला. चोरीचे सर्व सामान त्याने त्याच्या पिशवीत टाकले. त्याच दरम्यान त्याने त्याचा मोबाईल घरातच एका टेबलावर ठेवला. चोरीचे काम फत्ते होताच चोराने मोबाईल खिशात टाकला आणि धूम ठोकली. मात्र, घरमालक सकाळी जागे झाले तेव्हा तेही अचंबित झाले. कारण, चोरट्याने घरमालकाचा मोबाईल सोबत नेला आणि स्वतःचा मोबाईल त्या घरातच सोडून गेला. घरमालकाने तातडीने पोलिसांना ही बाब कळविली. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी आले. त्यांनी तो मोबाईल ताब्यात घेतला आणि तपास सुरू केला. आता त्याच्या आधारे पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.