नवी दिल्ली – येथील मयूर विहारच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रात्रीचे जेवण करून एक व्यापारी पायी मेट्रो स्टेशनकडे निघाला. मेट्रो स्टेशनजवळ पोहोचताच एका भामट्याने त्याच्या छातीवर चाकू लावला आणि म्हणाला, जे काही असेल ते काढून दे. व्यापाऱ्याकडे खिशात चार हजार रुपये होते. चोरट्याने इशारा करत ते पैसे रस्त्यावर फेकण्यास सांगितले. चोरट्याने सांगितल्याप्रमाणे व्यापाऱ्याने कृती केली. रक्कम लुटल्यानंतर चोरट्याला लक्षात आले की, व्यापारी विनापैसे घरी कसे जाईल. चोरट्याच्या मनाला पाझर फुटला. लुटलेल्या रकमेतून ४० रुपये काढून व्यापाऱ्याला दिले आणि इतर पैसे घेऊन चोरटा फरारी झाला.
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित डॉ. रमेश कुमार मूळचे आंध्र प्रदेशचे रहिवासी आहेत. ते इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग कॉपरेटचे सदस्य आहेत. त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुद्धा आहे. ते आपल्या व्यवसायाच्या कामानिमित्त दिल्लीत आले आहेत. पहाडगंज येथील एका हॉटेलमध्ये थांबले आहे. मयूर विहार फेज-१ येथील हॉटेल क्राउन प्लाझामध्ये इन्स्टिट्यूटतर्फे रविवारी रात्री रात्रभोज आयोजित करण्यात आले होते.
रात्री अकरा वाजता जेवण करून ते पायी मयूर विहार मेट्रो स्टेशनला जात होते. स्टेशनजवळ पोहोचताच अचानक एक चोरटा त्यांच्यासमोर आला. त्याने त्यांच्या छातीवर चाकू लावला. लुटीला विरोध केला तर जीवे मारण्याची धमकी देऊ लागला. पीडित खूपच घाबरले. त्यांनी खिशातून चार हजार रुपये काढून रस्त्याच्या बाजूला फेकून दिले. पीडिताच्या तक्रारीवरून मयूर विहार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत.