इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर प्रदेश प्रमाणेच मध्य प्रदेशातही राज्य सरकार बुलडोझरचा वापर करत आहे. राज्यातील राजगढ जिल्ह्यातील जिरापूरमध्ये एका दलित व्यक्तीच्या लग्नाच्या मिरवणुकीवर दुसऱ्या अल्पसंख्याक समाजाच्या लोकांनी दगडफेक केली. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले असून, त्यानंतर प्रशासनाने आरोपींच्या घरांवर बुलडोझर फिरवला आहे. त्यांनी केलेले बांधकाम अनधिकृत जागेवर असल्यामुळे ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिरापूरमध्ये किमान ४८ घरे जमीनदोस्त झाली आहेत. या घरांबाबत प्रशासनाने सांगितले की, ही सर्व सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे बांधण्यात आली आहेत. मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही मिरवणूक मशिदीच्या बाहेरून जात असताना अल्पसंख्याक समाजातील काही लोकांनी मोठ्या आवाजात संगीतावर आक्षेप घेतला. राजगडचे पोलिस अधीक्षक प्रदीप शर्मा यांनी सांगितले की, दोन समुदायातील सदस्यांमध्ये बाचाबाची झाली आणि दगडफेक झाली. ज्यामध्ये सहा वर्षांच्या मुलासह किमान पाच जण जखमी झाले आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आम्ही आठ जणांना अटक केली आहे.
या प्रकरणातील आरोपींनी महिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. मात्र अद्यापपर्यंत याबाबत पोलिसांकडे कोणतीही तक्रार आलेली नाही. ते म्हणाले- “सुरुवातीला एफआयआरमध्ये सहा जणांची नावे होती पण सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. शिवाय २१ आरोपींची ओळख पटली आहे. यातील सहा आरोपींचे शस्त्र परवानेही पोलिसांनी निलंबित केले आहेत. एफआयआर नोंदवल्यानंतर लगेचच जिरापूर वॉर्ड क्रमांकाच्या लोकांना नोटीस बजावण्यात आली असून या नोटीसद्वारे त्यांना त्यांचे घर सरकारी जमिनीवर बांधल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर ते तोडण्याची कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जिल्हा अधिकाऱ्यांच्या पथकाने १८ घरे पाडली आहेत आणि जिरापूरमध्ये आणखी ३० घरे काही प्रमाणात पाडली आहेत.
याबाबत माहिती देताना जिरापूरचे तहसीलदार ए. आर. चिरमण म्हणाले की, एकूण ४८ घरे जमीनदोस्त झाली आहेत. जी घरे अनधिकृत होती ती पाडण्यात आली आहेत.