बुलढाणा (इंडिया दर्पण वृतसेवा) – लहान मुलांवर पालकांना नेहमी लक्ष ठेवावे लागते. अन्यथा काही दुर्घटना घडू शकते, याचा नेम नाही. खेळत असताना एका लहान मुलाच्या गळ्याला फास लागल्याने दुर्घटना घडून त्यात या बालकाचा बळी गेला. या घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे पालकांनी लहान मुलांकडे कितीही लक्ष दिले तरी ते खोड्या करतच असतात. त्यातून काही वेळा त्यांच्या या खोड्या जीवघेण्याही होतात. खामगाव शहरातील असाच एक भयानक प्रकार समोर आला आहे.
खांबाला रुमाल बांधून खेळत असताना रुमालाचा गळफास लागून पुर्वेश आवटे नावाचा एका बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही बाब पालकांच्या म्हणजे आई वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी मुलाला रुग्णालयात दाखल केले पण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मुलाचा मृत्यू झाला होता.
विशेष म्हणजे पुर्वेश आवटे हा आवटे परिवारात एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबियांसह परिसरातील रहिवाशांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. मी अंगणात खेळतो असे सांगून पुर्वेश घराबाहेर बाहेर पडला होता. आडव्या लोखंडी खांबाला रुमाल बांधून खेळत असताना हा दुर्देवी प्रकार घडला. याप्रकरणी खामगाव पोलीस चौकशी करीत आहेत.