इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेल्या दोन वर्षांपासून उत्तर भारतातील नवी दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, चंदिगड या प्रांतांमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली असून चोरी आणि दरोड्याचे प्रकार सर्रासपणे घडत आहेत, केवळ श्रीमंत व्यक्तींच्या घरी दरोडे पडत नसून राजकीय नेत्यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरी देखील दरोड्याचे प्रकार घडत असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अशीच एक घटना हरियाणात घडली आहे. भारतीय जनता पक्षाचे हरियाणा राज्य कार्यकारिणीचे सदस्य राव सुरेंद्र सिंह यांचा पुतण्या संजय तन्वर यांच्या घरात 15 दिवसांपूर्वी ठेवलेला नोकर त्याच्या साथीदारांसह सुमारे 20 लाख रुपयांची रोकड आणि दागिने असा सुमारे 1.28 कोटी रूपयांचा ऐवज घेऊन लंपास झाला आहे. यामध्ये 39.25 लाख रुपयांचे हिऱ्याचे दागिने, 68.90 लाख रुपयांचे सुमारे 1.5 किलो दागिने यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे या नोकराने साथीदारांसह वृद्ध नोकर रूपसिंग यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी करून त्याला ओलीस ठेवले आणि घरात ठेवलेल्या दोन कुत्र्यांना औषध प्राशन करून बेशुद्ध केले. यानंतर त्यांनी घरातील दागिने आणि रोख रकमेवर हात साफ केला. वृद्ध सेवक रूपसिंगची प्रकृती गंभीर असल्याने त्याला चंदीगडला उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी संजय तंवर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी नोकर प्रवीण व अन्य चौघांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केल आहे.
राव सुरेंद्र सिंह यांच्या मुलाचे लग्न होते आणि पुतणे संजय तंवर संपूर्ण कुटुंबासह रात्री मिरवणुकीत गेले होते. संजय यांनी आपला नवीन नोकर प्रवीण आणि त्याचा 25 वर्षापासूनचा वृद्ध नोकर रूपसिंग ( वय 71 ) याला पहारा देण्यासाठी घरी ठेवले होते. सकाळी सहा वाजता संजय आले असता अनेक खोल्यांतील कपाट तुटलेले दिसून आले. तसेच, त्यातील दागिने व रोख रक्कम गायब असल्याचे त्यांनी पाहिले. रूपसिंगला बेशुद्ध करून बाथरूममध्ये ओलीस ठेवलेले आणि दोन्ही कुत्र्यांना बेशुद्ध केलेले आढळले. तपासादरम्यान प्रवीण आणि त्याचा मित्र अर्जुन बेपत्ता असल्याचे पोलिसांना आढळले. सीसीटीव्हीमध्ये प्रवीण स्पष्ट दिसत होता. त्याच्यासोबत आणखी चार तरुण होते. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.