नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नजिकच्या नोएडामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका ज्येष्ठ नागरिकाने सकाळी ११ वाजेच्या सुमारास आपल्या पत्नीचा नमस्कार केला. त्यानंतर त्याने थेट १९व्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.
नोएडा सेक्टर-१३७ येथील सुपरटेक इकोसिटी सोसायटीमध्ये ही घटना घडली. राजकुमार (वय ७०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. राजकुमार हे त्यांची पत्नी प्रेरणा यांच्या समवेत सुपरटेक इकोसिटी सोसायटीतील ओ टॉवरच्या फ्लॅट क्रमांक १९०२ मध्ये राहत होते. राजकुमार हे विमा कंपनीतून निवृत्त झाले होते. सकाळी अकराच्या सुमारास राजकुमार यांनी त्यांच्या पत्नीचे चरण स्पर्श केले. मला माफ कर, असे ते म्हणाले. त्यानंतर राजकुमार यांनी त्यांच्या १९ व्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीतून खाली उडी मारून आत्महत्या केली. सोसायटीच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
पोलिसांच्या चौकशीत प्रेरणा यांनी सांगितले की, राजकुमार यांना अनेक दिवसांपासून नैराश्याने गाठले होते. शिवाय ते अनेक आजारांनीही ग्रस्त होते. राजकुमार यांना २ मुली आणि १ मुलगा आहे. दोन्ही मुली दिल्लीत राहतात, तर मुलगा मुंबईत राहतो.









