इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सोशल मीडियामुळे तरुणाई खरोखर वेडी झाली आहे की काय ? अशी परिस्थिती सध्या तरी दिसून येते. कारण सेल्फी काढणे रील काढणे किंवा अन्य असेच काहीतरी ( उद्योग ? ) करणे यामध्ये आपल्या जीवावर बेतू शकते याचे कुणालाही भान राहिले नाही! नदी, नाले, विहिरी, समुद्रकिनारे या ठिकाणी सोशल मीडियाचा वापर करीत आपले फोटो काढण्याची जणू काही स्पर्धा सुरू आहे. यामध्ये अनेकांचे जीव जात आहेत, या घटना आता जणू काही सार्वत्रिक आणि सर्रास घडताना दिसून येतात. काही दिवसापूर्वीच एक तरुणी डोंगराच्या कडेला उभे राहून सेल्फी काढताना दरीत कोसळली आणि ठार झाली. तर एक नवविवाहित भारतीय दांपत्य परदेशात समुद्रात स्वतःचे फोटो काढताना बुडाले. अशा घटना नेहमीच घडून येताना दिसतात. डोंबिवली आणि परभणी शहरात देखील अशाच दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांच्या दोघांना जीव गमवावा लागला तर एका तिसऱ्या घटनेत महिला कर्मचाऱ्याला असे बिनकामाचे उद्योग करताना नोकरीवरून निलंबित होण्याची वेळ आली आहे.
तोल जाऊन विहिरीत पडला…
डोंबिवलीजवळील ठाकुर्लीमध्ये पंपहाऊसमधील खोल विहिरीत पडून बिलाल सोहिल शेख ( वय १८ ) हा तरूण खोल विहिरीत पडून मृत्यू पावला. तो मुंब्रा इथला रहिवासी होता.बिलाल हा त्याच्या दोन मित्रांसह ठाकुर्ली इथल्या पंपहाऊस इथे रील काढण्यासाठी गेला होता. रील काढताना तोल जाऊन बिलाल खोल विहिरीत पडला. यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला. पंरतु, आजूबाजूला कोणीच नव्हते. या घटनेमुळे या दोन्ही मित्रांनी रेल्वे सुरक्षा बलाकडे धाव घेतली आणि त्यांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. यानंतर रेल्वे सुरक्षा बलाने याबाबत पोलिसांना तात्काळ याची माहिती त्यांनी अग्निशमनन दलाला कळविले. अग्निशमन विभागाच्या पथकाने तब्बल ३२ तास शोधकार्य केले . अखेर बिलाल शेख याचा मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढला.
त्या विद्यार्थ्यांचा अखेर मृत्यू..
परभणीमध्ये चार महिन्यांपूर्वी असाच प्रकार घडला होता. दुचाकीवर रील तयार करणे विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतले आहे. शहरात २६ जानेवारी रोजी झेंडावंदनला एकाच दुचाकीवरुन जाणाऱ्या चार विद्यार्थ्यांचा रील तयार करताना अपघात झाला होता. यामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते. तीघांना उपचारासाठी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.
दरम्यान,उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आगारात त्या कार्यरत महिला कंडक्टर मंगला गिरी यांना रील बनवल्या प्रकरणी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या निलंबित करण्यात आले. परवानगीशिवाय बस चालकाच्या सीटवर बसून व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला होता. यामुळे राज्य परिवहन विभागाची प्रतिमा मलीन झाली, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.