इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – संत, महंत यांच्याविषयी समाजात म्हणजे सर्वसामान्य नागरिकांमध्ये एका प्रकाराचा आदरचा दृष्टिकोन असतो. त्यांच्याकडे त्यागमूर्ती या भावनेने पाहिले जाते. परंतु काही वेळा भोंदू संत, महंत यांच्या गैरकृत्यांमुळे अन्य संत मंहतही बदनाम होतात. अशाच एका स्वार्थी साधू महंतांच्या गैरप्रकाराची सध्या उत्तर प्रदेशात खूप चर्चा होत आहे. तसेच यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
लखनौ मधील मोठ्या काली मंदिराचे महंत आणि ट्रस्टचे सचिव ओम भारती यांना सोमवारी रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली आहे. अश्लिल चाळ्यांसह गैरवर्तन केल्याचा भारती यांच्यावर आरोप आहे. रात्री 12.45 च्या सुमारास यांना अटक करण्यात आली. मंदिराच्या परिसरात प्रसाद विकणाऱ्या आणि फोटोग्राफी करणाऱ्या तरुणाने महंतांविरोधात तक्रार दाखल केली होती.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फोटोग्राफी करणाऱ्या आणि प्रसादाचे दुकान चालविणाऱ्या युवकाने तक्रार दिली होती की, तो मंदिरात फोटोग्राफी करतो आणि त्याचे आवारातच प्रसादाचे दुकानही आहे. विधवा आई आणि अल्पवयीन बहिणीसोबत तो तेथे राहतो. मंदिराचे सध्याचे महंत ओम भारती यांनी अनेकदा त्या युवकाला आपल्या खोलीत बोलावून हात पाय दाबण्यास सांगितले, मात्र त्याने नकार दिल्यास महंत त्याला दुकान रिकामे करण्याची धमकी देत असते. एके दिवशी रात्रीच्या आरतीनंतर महंताने त्या युवकाला आपल्या खोलीत थांबवले. त्यानंतर त्याच्यासोबत अश्लील वर्तन करून अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. या आधीही महंतने अनेकवेळा अश्लील कृत्य केले. तसेच, महंतने आपल्या अल्पवयीन बहिणीवरही लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप युवकाने केला आहे. आरोपी महंत याला अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.