नाशिक – शहरात महिला व मुलींच्या असाह्यतेचा फायदा घेत तसेच विविध आमिषे दाखवून बलात्कार केले जात आहेत. एकाने ज्योतीष शास्त्र शिकविण्याचा बहाणा करून महिलेस गुंगीचे औषध पाजून बलात्कार केला तर मैत्रीच्या नावाखाली त्रिकुटाने अल्पवयीन मुलीस एका लॉज मध्ये घेवून जात बलात्कार केला. वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या या घटनेत चार जणांना अटक करण्यात आली असून, याप्रकरणी मुंबईनाका आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंगाडा तलाव भागात राहणाऱ्या सुनिल रामचंद्र शर्मा (४० रा.अभिमन्यु अपा.गुरूद्वारारोड) याने परिसरातील महिलेस ज्योतिषशास्त्र शिकविण्याचा बहाणा करून मैत्री केली. त्याने लग्नाचे आमिष दाखवून तसेच गुंगीचे औषध कोल्ड्रींगमध्ये टाकून वेळोवेळी बलात्कार केला. २२ डिसेंबर २०१९ ते ३ एप्रिल २०२१ दरम्यान संशयिताने हे कृत्य केले. या काळात त्याने महिलेस दमदाटी करीत व बदनामीची धमकी देत दीड लाख रूपये आणि सोन्याची अंगठी काढून घेतली. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीसांनी त्यास अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गेंगजे करीत आहेत.
दुसरी घटना नाशिकरोड परिसरात घडली आहे. नाशिक रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूझान समिर पठाण (२० रा.जुना ओढारोड, सिन्नरफाटा), रवी विठोबा देवरे (२४ रा.वृंदावननगर,मुक्तीधाम) व रोशन नरेश कोंबरे (१९ रा.राजधानी चौक,दत्तमंदिररोड) या त्रिकुटाने परिसरातील अल्पवयीन पिडीत मुलीशी मैत्री केली. २५ जुलै रोजी दुपारच्या सुमारास तिला बिटको चौकात भेटण्यासाठी बोलावून घेतले. यावेळी त्यांनी हॅपी गेस्ट हाऊस येथे मुलीस घेवून जात रूझान पठाण या संशयीतांने तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. तर उर्वरीत दोघांनी त्यास लॉज बुक करण्यास मदत केली. ही बाब मुलीने आपल्या घरी जावून कुटूंबियांकडे आपबिती कथन केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून पोलीसांनी तिघांना अटक केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पठाण करीत आहेत.