पाटणा (बिहार) – साधारणत : आपण भंगारमध्ये कागद, काच, पत्रा किंवा पेपरची रद्दी देतो. परंतु एका व्यक्तीने तर चक्क रेल्वे इंजिन भंगारात विकण्याचा प्रयत्न केला. बिहारच्या समस्तीपूर रेल्वे विभागात हा प्रकार घडला. येथील एका अभियंत्याविरुद्ध पूर्णिया रेल्वे स्टेशनच्या बाहेर वर्षानुवर्षे उभ्या असलेल्या वाफेचे इंजिन विकल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
समस्तीपूर रेल्वे विभागाचे व्यवस्थापक आलोक अग्रवाल यांनी सांगितले की, या प्रकरणी पूर्णिया जिल्ह्यातील बनमंखी येथील अभियंता राजीव रंजन झा यांच्यासह सात जणांवर पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. ते आणखी म्हणाले की, दि. 14 डिसेंबर रोजी समस्तीपूर डिझेल शेडचे अभियंता राजीव रंजन झा आणि त्यांचे मदतनीस सुशील यादव यांना रेल्वे स्टेशनजवळ उभ्या असलेल्या जुन्या स्टीम इंजिनला गॅस कटरने कापताना आढळले. पूर्णिया कोर्ट स्टेशनचे पोलिस चौकीचे प्रभारी एम.एम. रहमान यांनी यावेळी झा यांना थांबवले असता त्यांनी डिझेल शेडच्या विभागीय अभियंत्याचे खोटे पत्र दाखवले की, या इंजिनचे भंगार भाग (पार्ट) डिझेल शेडमध्ये परत नेण्यात यावेत.
अग्रवाल यांनी सांगितले की, झा यांनी या प्रकरणी मेमो देखील जारी केला होता, दुसऱ्या दिवशी रेल्वे पोलिसांनी यांनी हे भंगार वाहून नेणाऱ्या वाहनांना तेथे प्रवेश करताना पाहिले, परंतु त्यावर भंगार माल लोड करणे शक्य नसल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली गेली. या संदर्भात पोलिसांनी केलेल्या तपासा दरम्यान डिझेल शेडमधून इंजिनचे भंगार पार्ट आणण्याचे कोणतेही आदेश दिले नसल्याचे विभागीय अभियंता यांनी नमूद केले. या प्रकरणाबाबत डीआरएमच्या सूचनेवरून डिझेल शेड पोस्टवर तैनात असलेल्या इन्स्पेक्टर वीरेंद्र द्विवेदी यांच्यासह तीन रेल्वे कर्मचाऱ्यांना निष्काळजीपणाच्या आरोपाखाली तत्काळ निलंबित करण्यात आले असून वरिष्ठ तपास पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.