इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बनावट मुलगा बनून जमीनदाराची मालमत्ता हडप करु पाहणाऱ्याला न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील एका जमीनदाराची मालमत्ता एका व्यक्तीने हडपली. न्यायालयाने ही जमीनदाराची फसवणूक आहे असे म्हटले आहे. मालमत्तेचा सध्याचा मालक हा जमिनदाराचा मुलगा नसून त्याने चतुराईने ती मालमत्ता हडपली.
कनिष्ठ न्यायालयात ४१ वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्यात न्यायालय आता एका महिन्यात निकाल देणार आहे. जिल्हा न्यायाधीश रमेशचंद्र द्विवेदी या प्रकरणाची सुनावणी करत आहेत. २५ मे रोजी दोन्ही बाजूंच्या वकिलांच्या युक्तिवादानंतर त्यांनी निर्णय राखून ठेवला होता. आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. १९ मे रोजी कामेश्वर सिंह यांचा मुलगा असल्याचे सांगणाऱ्या दयानंद गोसाईंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोसाई याने जमीन हडपण्यासाठी चुकीचे मृत्यू प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी बिहार पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दयानंद गोसाई दोषी आढळल्यास जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते, असे फिर्यादी अधिकारी डॉ. राजेश पाठक यांनी सांगितले. तसेच त्याला इतर कलमांखाली स्वतंत्रपणे शिक्षा होऊ शकते.
मॅट्रिकची परीक्षा देण्यासाठी गेलेला मुलगा बेपत्ता
बेन पोलीस स्टेशन परिसरात राहणारे कामेश्वर सिंग हे जमीनदार होते. त्यांना कन्हैया नावाचा एकुलता एक मुलगा होता. कन्हैया १९७५ मध्ये मॅट्रिकची परीक्षा देण्यासाठी चंडी येथे गेला होता. तेथून तो बेपत्ता झाला. बराच शोध घेऊनही तो न सापडल्याने सिलाव (सध्या बेन) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, १९८१ मध्ये भिक्षूच्या वेशात एक तरुण मोरगव्हाण येथे भीक मागण्यासाठी पोहोचला. त्याने स्वतःला जमीनदार कामेश्वर सिंह यांचा मुलगा असल्याचे सांगितले.
कामेश्वर सिंह वयाच्या ७५ व्या वर्षी या तरुणाला भेटायला आले होते. तरूणाने कामेश्वर सिंगला बाप-बाप म्हणत मिठी मारली. पण वडिलांनाही त्याच्यावर संशय आला होता. पण तरी ते त्या मुलाला घरी घेऊन आले. त्या मुलाला पाहताच कामेश्वर सिंहच्या पत्नीला हा आपला मुलगा नसल्याचे समजले. पण कामेश्वर सिंह यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांना धक्का लागू नये म्हणून पत्नी रामसखी देवी त्यावेळी काहीच बोलल्या नाहीत. यानंतर कामेश्वर सिंग यांना समजावून सांगितले. तोपर्यंत त्याने जमिनीसोबत फेरफार केली होती.