इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चोरटे कधी काय लांबवतील याचा नेम नाही. मध्य प्रदेशात पाच चोरट्यांनी थेट पोलिसांचाच स्निफर डॉग (कुत्रा) चोरुन नेल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी ओरछा पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. तसेच, आपला श्वान परत मिळाल्याने पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बॉम्ब आणि चोरट्यांचा माग काढण्यासाठी उपयुक्त असलेला पोलिसांचा स्निफर डॉगच चोरट्यांनी पळवून नेला. ही बाब उघड होताच पोलिस दलात चांगलीच खळबळ माजली. त्यामुळे पोलिसांचे विशेष पथक नेमण्यात आले आणि या श्वानाचा शोध घेण्याचे काम सुरू झाले. अखेर चिरगाव झाशी येथील बाहुबलींच्या ठिकाणावरुन पोलिसांनी श्वान पुन्हा प्राप्त केला आहे. कुत्र्याचा पाठलाग करण्यासाठी वापरलेली स्कॉर्पिओ गाडी (क्रमांक UP 93 A Z 3104) सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे. यासोबतच पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. त्यात हेमंत साई, अनुज सरवरिया, गौरव उर्फ तनु पाठक, राणू राजपूत आणि रोहन पुरेहित (सर्व रा. चिरगाव, जि. झाशी) यांचा समावेश आहे. याप्रकरणी श्वानाच्या मास्टरला निलंबित करण्यात आले आहे.
ओरछा येथे पर्यटक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे निवारी पोलिसांनी कुत्र्याला ओरछा येथील पर्यटन धर्मशाळेत ठेवले होते. हा कुत्रा लॅब्रा प्रजातीचा आहे. 19 एप्रिल रोजी मास्टर जमना प्रसाद अहिरवार याने कुत्र्याला फिरवण्यासाठी रामराजा मंदिराजवळ नेले होते. यानंतर रात्री 11.30 च्या सुमारास एक मिरवणूक मंदिराजवळून जात होती. मिरवणुकीत डीजे आणि फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. याचदरम्यान डीजे आणि फटाक्यांच्या भीतीने कुत्रा जमना प्रसाद यांच्या हातातून पळून गेला. यानंतर कुत्रा सापडला नाही. त्याचा शोध घेण्यासाठी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. ज्यामध्ये काही लोकांनी स्कॉर्पिओ वाहनातून कुत्र्याला नेल्याचे दिसून आले. जमना अहिरवार यांनी याबाबत पोलिसांना तक्रार दिली. अखेर आता कुत्रा सापडल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.