इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – साधारणपणे चोरी, हाणामारी, दरोडा, खून या सारख्या गुन्हेगारी घटनांमध्ये पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येते. विशेषतः घरफोडी किंवा चोरीमध्ये दागदागिने किंवा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार नोंदविली जाते, परंतु एका महिलेने चक्क आपला ससा चोरीला गेल्याची तक्रार नोंदविली, आणि पोलिसांना तो शोधून देण्याचा तगादा लावला. त्यासाठी तिने अन्नपाणी देखील सोडले. अखेर वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिसांनी वेगवेगळे पथके नेमून सात दिवसात बेपत्ता झालेल्या त्या सशाचा शोध लावला आणि त्या मादी सशाला दोन पिल्लासह महिलेच्या ताब्यात दिले, तेव्हा कुठे या महिलेचा जीव भांड्यात पडला. अन्यथा ससा दिसेनासा झाल्याने ती महिला आजारी पडली होती.
राजधानी दिल्ली आणि उत्तर प्रदेश सीमावर्ती भागात साहिबााबाद पोलीस स्टेशन परिसरात एका महिलेचा ससा चोरीला गेल्याची घटना समोर आली. महिलेच्या तक्रारीनंतर साहिबाबाद पोलिस ठाण्यातून तीन पथके तयार करण्यात आली. आठवडाभर या पथकाने शहरातील जंगलात करडी नजर ठेवली आणि रात्री दीड वाजता ससा शोधण्यात पोलिसांना यश आले.
याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले कविनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालकुवान येथे राहणारी देवंती विजेता ही अनेक वर्षांपासून ससे पाळत आहे. ओळखीच्या संजय नावाच्या माणसाला एक ससा काळजी घेण्यासाठी दिला. तिने ससा दिला आणि ती गावाला निघून गेली. मे महिन्यात ती परत आली आणि त्यांनी संजयला आपला ससा मागितला आणि त्याने बेपत्ता झाल्याची माहिती दिली. त्यावरून वाद झाल्यावर तिची प्रकृती खालावली.
ती म्हणाली की, मी सशाची लहान मुलासारखी काळजी घेत होते. त्यानंतर तिने संजयसह तीन कर्मचाऱ्यांवर ससे चोरीचा संशय व्यक्त केला. साहिबााबाद पोलिसांनी संजय, रसुली आणि लहाने यांच्याविरुद्ध ससा चोरीची तक्रार दिली. ससा शोधण्याचे आश्वासन देऊन पोलिसांनी तीन दिवस शहराच्या जंगलाच्या प्रत्येक कोपऱ्यात लक्ष ठेवले, परंतु यश आले नाही.
विशेष म्हणजे ससा शोधण्यासाठी सात दिवसांपासून सिटी फॉरेस्टमध्ये शोधमोहीम सुरू होती. सोमवारी रात्री दीडच्या सुमारास ससा पकडण्यात पोलिसांना यश आले. महिलेने आपला ससा ओळखला आहे. दरम्यान, या मादी सशाने सात दिवसांत दोन पिल्लांना जन्म दिला. अखेर ससा आणि तिची पिल्ले त्या महिलेच्या ताब्यात देण्यात आली आहेत.