सोलापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रागाच्या भरात कोण काय करेल याचा नेम नसतो. विशेषतः तरुण मुले राग आल्यास काहीही करण्यास धजावतात. त्यातच आपले नुकसान झाले तर ते टोकाचाही निर्णय घेतात. सोलापूरच्या एका तरुणाची एक धक्कादायक बाब उजेडात आली आहे. स्वतःची दुचाकी चोरीला गेल्याने तो संतप्त झाला. त्याचा राग एवढा होता की त्याने चक्क २९ मोटरसायकल चोरल्या. पोलिसांच्या हाती तो लागला आणि त्यानेच जेव्हा हा खुलासा केला तेव्हा पोलिसही चक्रावले.
सोलापूरमधील या पठ्ठ्याने त्याची बाईक चोरीला गेली म्हणून एक दोन नव्हे तर तब्बल २९ बाईक चोरल्या. या बाईकचोरासह त्याच्या अन्य साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली आहे. सध्या याप्रकरणी पुढील तपास केला जातो असून सोलापूर पोलिसांनी नुकताच दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. सदर वाहन चोरणाऱ्या टोळीकडून तब्बल २९ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. सोलापूर मार्केट यार्ड परिसरात गेल्या काही दिवसांत दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. याच टोळीने मार्केट यार्डात दुचाकी चोरट्याचा सपाटा लावला होता. अखेर सोलापूर पोलिसांच्या क्राईम ब्रांचने या टोळीच्या मुसक्या आवळल्यात.
सोलापूर क्राईम ब्रांच पोलिसांनी एका संशयित चोरट्याचा तपास सुरु केला होता. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्याच्या इतर साथीदारांची कसून चौकशी सुरु केली. यानंतर या चोरट्याच्या अन्य दोघा जणांची माहिती मिळवत पोलिसांनी त्यांनाही अटक केली. एकूण तिघांना आतापर्यंत अटक करण्यात आली असून त्यांनी चोरी केलेल्या दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतल्यात. तब्बल २९ दुचाकी या तिघा जणांच्या टोळीने चोरल्या होत्या.
विशेष म्हणजे या टोळीच्या प्रमुखाचे वाहन मार्केट यार्ड परिसरातून चोरीला गेलं होतं. त्यामुळे रागापोटी त्याने इतर साथीदारांच्या मदतीने एक-दोन नव्हे तर तब्बल २९ मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत एकूण ८ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Crime Police Investigation Youth Bike Stolen