रोहित सारडा, ओझर
ओझर: टाऊनशिप येथील स्टेडियम कॉम्प्लेक्स मधील स्वातंत्र्यदिन ध्वजारोहण कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना तिघांनी मागील झालेल्या एका कार्यक्रमात वादाची खुन्नस डोक्यात ठेऊन नितीन गांगुर्डे या इसमावर कोयत्याने जबर वार केले. यात डोक्यावर घाव घालण्याच्या नादात गांगुर्डे याने हात आडवा केल्याने जीव वाचला परंतु डाव्या हाताचे बोट तुटले तर तीन बोटांना गंभीर दुखापत झाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की ओझर टाऊनशिप येथून ध्वजारोहण कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना त्याच्यावर रोहन आहिरे,अमित रामोशी रा. दीक्षी व ओझर आंबेडकर नगर येथील करण जाधव यांनी माग ठेवत गांगुर्डे यास गाठले. चार पाच महिन्यांपूर्वी दिक्षी येथे एका लग्नसमारंभात घोडा घेऊन आलेल्या नितीन गांगुर्डे याच्याशी काही वाद झाले होते. त्याचे राग मनात ठेऊन सदर हल्ला झाला.यावेळी घराकडे पळत सुटलेल्या गांगुर्डे यांस अमित रामोशी आणि करण जाधव यांच्याकडील कोयत्याने थेट वार करत डाव्या हातावरील करंगळी तोडत इतर तीन बोटांना देखील गंभीर इजा पोहोचवली.घटनेनंतर मोठा तणाव निर्माण झाला होता.
यावेळी ओझर पोलिसांनी तातडीने धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर पिंपळगावचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांना देखील पाचारण करण्यात आले.पसार झालेल्या आरोपींना ताब्यात घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर असताना ओझरचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, दुर्गेश तिवारी, हवालदार, दीपक गुंजाळ,कॉन्स्टेबल जितेंद्र बागुल पोलीस,राजेंद्र डंबाळे,बी.जे आहेर यांनी गुन्हा दखल होण्यापूर्वीच तातडीने पिंपळगाव येथून काही तासात आरोपींना ताब्यात घेत पुढील कारवाही केली.पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करत आहे. सदर घटनेतील रोहन अहिरे हा विधी संघार्शित आहे. शुक्रवारी आरोपींना न्यायालयात उभे केले जाणार आहे.








