नवी दिल्ली – सोशल मीडिया साइट्सवर जर तुम्हाला अनोळखी तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट आली असेल आणि पॉर्न चॅट किंवा न्यूड व्हिडिओ कॉलची ऑफर आली तर सतर्क व्हा. कारण या माध्यमातून तुम्ही हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढले जाऊ शकतात. गाझियाबाद पोलिसांनी अशा एका टोळीचा पर्दाफाश करून चार महिलांसह पाच जणांना अटक केली आहे.
या महिला फोनवर आधी अश्लील गप्पा मारून नागरिकांना फसवत होत्या. त्यानंतर न्यूड व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळत होत्या. लाज वाटत असल्याने कोणीही या गोष्टीची बाहेर वाच्यता करत नव्हते. याच गोष्टीचा गैरफायदा ही टोळी उचलत होती.
नंदिग्राम पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमित कुमार आणि सायबर सेलचे प्रभारी सुमित कुमार यांच्या पथकाने या टोळीवर कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये योगेश गौतम (मरियम नगर, नंदिग्राम), त्याची पत्नी सपनासह निकीता ( सिहानी गेट), निधी (कोतवाली) आणि प्रिया (प्रेमनगर, गाझियाबाद) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून अनेक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिस आरोपींची चौकशी करत असून. हळूहळू वेगवेगळ्या प्रकरणांचा उलगडा होत आहे.
५०० नागरिकांकडून २० कोटी उकळले
दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेत असताना एका युवक योगेश गौतम आणि युवती सपना यांचे आपसात प्रेम जडले. दोघांनीही नंतर लग्न करून हनीट्रॅप टोळी बनविली. तीन वर्षात ५०० नागरिकांना ब्लॅकमेल करून जवळपास २० कोटी रुपये लुबाडले आहेत. सायबर सेलच्या पोलिसांनी दांपत्यासह पाच जणांना अटक केली आहे. ही टोळी राजनगर एक्सटेन्शनच्या ऑफिसर सिटी सोसायटीत किरायाने फ्लॅट घेऊन फसवणूक करत होते.