नाशिक – चोरट्यांनी लहान मुलांच्या शालेय आहार शिजविण्याच्या भांड्यासह मुख्याध्यापकांच्या खोलीतील साहित्य चोरुन नेल्याची घटना गोरेवाडीत महापालिकेच्या शाळेत घडली आहे. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. गोरेवाडी महापालिका शाळा क्रमांक ५० मध्ये चोरट्यांनी दोन दिवसांच्या शाळेला सुट्टी असल्याची संधी साधत ही चोरी केली आहे. या सुट्टीच्या काळात शाळेतील मुख्याध्यापकांच्या कार्यालयाचे बंद दरवाजाचे कडी कूलूप तोडून कार्यालयातून ही चोरी केली. या चोरीत शाळेची साउंड सिस्टीम, शाळेची पितळी घंटा, स्वयंपाकाची भांडी, तीन लोखंडी बादल्या. सीपीयु सहसंगणक, विद्यार्थ्याना वाटण्यासाठी असलेले १५ दप्तर शाळेची हामर्नियम पेटी आदी ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.