नाशिक : गोरेवाडीत मागील भांडणाची कुरापत काढून दोघा नातेवाईकांनी महिलेच्या घरात घुसून वस्तूंची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या नातेवाईकांनी हातात कोयता तलवार आणि लाठ्याकाठ्या घेवून ही तोडफोड करुन सामानांचे नुकसान केले आहे. अजय साळुंखे आणि अमोल नराळे (रा. दोघे नाईकवाडी मनपा हॉस्पिटल शेजारी,गोरेवाडी) अशी तोडफोड करणा-या नातेवाईकांची नावे आहेत. याप्रकरणी उज्वला जिंतेद्र गायकवाड (रा.गोरेवाडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आणि तक्रारदार महिला एकमेकांचे नातेवाईक आहेत. गुरूवारी रात्री ही घटना घडली. संशयितांनी मागील भांडणाची कुरापत काढून हातात कोयता व तलवार घेवून महिलेच्या घरात प्रवेश केला. यावेळी संतप्त दुकलीने महिलेस शिवागाळ करीत घरातील सामान अस्ताव्यस्त फेकून देत मौल्यवान वस्तूंची तोडफोड केली. या घटनेत मोठे नुकसान केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.