नाशिक : गंजमाळ भागात मागील भांडणाची कुरापत काढून एकावर चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. संतोष मधुकर कर्डक (रा.सुकेणे राजवाडा ता.निफाड) असे चाकू हल्ला करणा-या संशयिताचे नाव आहे. या घटनेत ४० वर्षीय इसम जखमी झाला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मंगेश सुरेश भालेराव ( रा.रमाबाई आंबेडकर नगर,भद्रकाली) यांनी तक्रार दाखल केली आहे. भालेराव बुधवारी रात्री जेवण आटोपून गंजमाळ येथील मास्टर मॉल येथे बसण्यासाठी गेले असता ही घटना घडली. मद्याच्या नशेत आलेल्या संशयिताने त्यांच्याशी मागील भांडणाची कुरापत काढून वाद घातला. यावेळी संशयिताने शिवीगाळ व लाथाबुक्यांनी मारहाण करीत त्यांच्यावर चाकू हल्ला केला. या घटनेत भालेराव जखमी झाले असून, अधिक तपास पोलीस नाईक रायते करीत आहेत.