नाशिक : तरूणाच्या बँक खात्याची माहिती मिळवित परस्पर एक लाख रूपयाला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. क्रेडिट कार्ड पत्यावर पाठवितो असे सांगून या भामट्याने ही फसवणूक केली आहे. भावेश शांताराम वळवी (२३ रा.कौटी गार्डन,जत्रा नांदूर लिंकरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन आडगाव पोलीस ठाण्यात आयटीअॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या फसवणूकीबाबत समजलेली माहिती अशी की, वळवी ३० मार्च रोजी आपल्या घरी असतांना मनिष वर्मा नामक इसमाने त्यांच्याशी ९६९२७९१९३५ या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधला होता. वळवी यांना एसबीआय बँकेचे क्रेडिट कार्ड मिळणार असल्याचे सांगून या भामट्याने गोपनीय माहिती मिळवली. त्यानंतर त्याने बँक वळवी यांच्या मोबाईलवर एक लिंक पाठवली. या लिंकवरील माहिती वळवी भरल्यानंतर एसबीआय बँक खात्यातील ९९ हजार ९९९ रूपयांची रोकड परस्पर ऑनलाईन अन्य खात्यात वळते करून या भामट्याने पैसे काढून घेतले. पैसे काढण्यात आल्याचा संदेश मिळताच वळवी यांनी बँकेशी संपर्क साधला असता ही घटना उघडकीस आली. त्यानंतर वळवी पोलीस स्थानकात तक्रार केली. या फसवणूक प्रकरणी अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख करीत आहेत.