नाशिक : गंगापूर रोड येथे फवारणी व स्वच्छता करण्याच्या बहाण्याने घरात आलेल्या मनपाच्या चार तोतया कर्मचार्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण ३ लाख ८५ हजारांचा ऐवज लंपास केला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी कुसुम पुरुषोत्तम जोशी (वय ८२, रा. पुष्कराज बंगला, शांतीनिकेतन सोसायटी, गंगापूर रोड, नाशिक) या ८ एप्रिल रोजी दुपारी १२ च्या सुमारास घरी असतांना ही घटना घडली. चार अनोळखी इसमांनी “आम्ही महानगरपालिकेचे कर्मचारी आहोत,” असे म्हणून त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर घरात फवारणी व स्वच्छता करण्याच्या बहाण्याने घरातील कपाटात असलेल्या १ लाख ८० हजार रुपये किमतीच्या सहा तोळे वजनाच्या सोन्याच्या पाटल्या, १ लाख ८० हजार रुपये किमतीच्या सहा तोळे वजनाच्या सोन्याच्या चार बांगड्या, तसेच २४ हजार ९०० रुपयांची रोख रक्कम असा एकूण ३ लाख ८४ हजार ९०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. दरम्यान २५ ते ३० वयोगटातील अनोळखी इसम घरातील काम आवरून गेल्यानंतर घरातील सोन्याचा ऐवज लंपास झाल्याची बाब जोशी यांच्या लक्षात आली. त्यानंतर गंगापूर पोलीस ठाण्यात चार अज्ञात इसमांविरुद्ध फिर्याद नोंदविण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भिसे करीत आहेत.









