घोटी –पेशंट सोडण्याच्या बहाण्याने वाहन ठरवून चालकास वाहन मध्येच थांबविण्यास सांगून त्याच्याकडील सोन्याचा गोफ व मोबाईल अज्ञात दोन चोरट्यांनी बळजबरीने चोरून नेल्याची घटना घोटी येथे घडली आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात इसमांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी मधुकर दत्तू कर्डिले (वय ४४, रा. सुधानगर, घोटी, ता. इगतपुरी) हे काल दुपारी साडेबाराच्या सुमारास द्वारका येथे एमएच १५ ईबी २७३५ या क्रमांकाच्या महिंद्रा एक्झिमो गाडीसह उभे होते. त्यावेळी ३० ते ३५ वयोगटातील दोन अज्ञात इसम त्यांच्याजवळ आले. त्यांनी कर्डिले यांना घोटी येथे पेशंट सोडण्याचे सांगून तुमची गाडी मिळेल का, असे विचारले. त्यानुसार कर्डिले यांना ८०० रुपये भाडे ठरवून एक्स्लो पॉईंट येथील आशीर्वादनगर येथून घोटीला जायचे आहे, असे खोटे सांगितले. द्वारका येथून कारसह दोन अज्ञात इसम कारचालकासह निघाले. त्यावेळी कर्डिले यांना मध्येच गाडी थांबविण्यास सांगितले. त्यावेळी दोघा अज्ञात इसमांनी संगनमत करून कर्डिले यांच्या गळ्यात असलेला ४० हजार रुपये किमतीचा दहा ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोफ, तसेच दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण ५० हजार रुपये किमतीचा ऐवज बळजबरीने काढून घेत मोटारसायकलीवरून पसार झाले. असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.