नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) कुरियर कंपनीच्या कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे भासवून अनोळखी व्यक्तीने पती-पत्नीच्या बँक खात्यातून १ लाख ७१ हजार ९९६ रुपये परस्पर काढून घेत आर्थिक फसवणूक केल्याची घटना देवळाली कॅम्प येथे घडली. यशवीरसिंग चौहाण रा.उमराव विहार, देवळाली कॅम्प यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि.३ एप्रिल रोजी सकाळी साडे आठ वाजेच्या दरम्यान त्यांची पत्नी दीपा चौहाण यांच्या मोबाईलवर ८४८०४३८२२० या फोन नंबर वरून एका अनोळखी व्यक्तीने संपर्क करून आपण कुरियर कंपनीच्या कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे सांगितले. या व्यक्तीने दीपाच्या मोबाईल नंबरवर एक लिंक पाठविली आणि युपीआय पिन आणि ओटीपी नंबर घेतला आणि दीपा चौहाण आणि यशवीरसिंग चौहाण या पती पत्नीच्या बँक खात्यावरून १ लाख ७१ हजार ९९६ रुपये परस्पर काढून घेत आर्थिक फसवणूक केली. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.