नाशिक : नगरसेविकेच्या पतीकडून ५० हजाराची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत प्रविण निकाळे (२३ रा.श्रीजी अपा.महालक्ष्मीनगर) असे खंडणी मागणा-या संशयीताचे नाव आहे. याप्रकरणी धनंजय उर्फ पप्पू भास्कर माने (रा.मेरी रासबिहारी लिंकरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. माने यांच्या पत्नी नगरसेविका असून या दांम्पत्याचे राजकीय करिअर संपविण्याच्या इराद्याने संशयिताकडून त्रास दिला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संशयित समाजात बदनामी करण्याची धमकी देत माने दांम्पत्याकडे पैसे उकळत आहे. २ ते ७ एप्रिल दरम्यान संशयिताने धमकी देत ५० हजाराची खंडणी उकळली. मात्र त्याची मागणी वाढल्याने तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असल्याने माने दांम्पत्याने पोलीसात धाव घेतली. याप्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक घिसाडी करीत आहेत.








