नाशिक : तिडके कॉलनीत खरेदीच्या बहाण्याने शोरूममध्ये शिरलेल्या चौघा भामट्यांनी काऊंटरमध्ये लावलेले अलंकार चोरून नेल्याचा प्रकार घडला. चोरट्यांमध्ये दोन महिलांचा समावेश असून कर्मचा-यांना बोलण्यात गुंतवून भामट्यांनी हा डल्ला मारला. ही घटना सीसीटिव्ही कॅमे-यात कैद झाली असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश ताराचंद धोका (रा.गंगापूर रोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. धोका तिडके कॉलनीतील श्रीहरी कुटे मार्गावरील कंचनपुष्प जेम्स अॅण्ड ज्वेल्स बिझनेस या सराफी शोरूमचे काम बघतात. गुरूवारी (दि.७) रात्री ही घटना घडली. दोन महिला व दोन पुरूष गुरूवारी शोरूममध्ये अलंकार खरेदीच्या बहाण्याने आले होते. भामट्यांनी कर्मचा-यांनी उपस्थित कर्मचा-यांना बोलण्यात गुंतवून काऊंटरमध्ये लावलेल्या सुमारे ८० हजार रूपये किमतीच्या हि-याच्या कानातील रिंगा चोरून नेल्या. ही घटना सीसीटिव्ही यंत्रणेत कैद झाली असून अधिक तपास उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.