नाशिक : घटस्फोटाची केस मागे घ्यावी या मागणीवरून पतीने पत्नीवर चाकू हल्ला केल्याची घटना गंजमाळ परिसरात घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मुंबईस्थीत पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदिप दामू मगरे (रा.गौतम नगर,गोवंडी मुंबई) असे आपल्या पत्नीवर चाकू हल्ला करणा-या पतीचे नाव आहे. याप्रकरणी जयश्री गायकवाड – मगरे (रा.भिमवाडी,गंजमाळ) यांनी तक्रार दाखल केली आहे. जयश्री मगरे या गुरूवारी (दि.७) कामावरून आपल्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. तक्रारदार आणि संशयित पती पत्नी असून त्यांचा न्यायालयीन वाद सुरू आहे. जयश्री मगरे या रात्रीच्या सुमारास कामावरून घराकडे जात असतांना घासबाजार भागात संशयितांने त्यांना गाठून तू माझ्याशी फारकत का घेत आहे तसेच मला कोर्टात चकरा मारायला लावतेका तुला बघतोच असे म्हणून त्याने डोक्याचे केस धरून शिवीगाळ करीत महिलेस लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी संतप्त संशयिताने पत्नीच्या गळयावर चाकूने वार करून त्यांना जखमी केले. अधिक तपास उपनिरीक्षक जे.के. माळी करीत आहेत.