नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अनैतिक संबंधास विरोध दर्शविल्याने महिलेच्या दोनवर्षीय मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाणीसह सिगारेटचे चटके देणा-या बाबासाहेब भगवान कपाटे (वय ३०) रा. अंधारी पळशी. ता. सिल्लोड, जि औरंगाबाद हल्ली रा.रमाबाई आंबेडकर नगर, गुलाबवाडी, मालधक्का रोड, देवळाली गाव या संशयिताला त्याच्या विरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी नंतर जामीन मिळताच त्याच्याकडून पीडित महिलेला पुन्हा धमकावण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी घडला. संबधित महिलेने नाशिकरोड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी संशयित बाबासाहेब कपाटेस ताब्यात घेतले असता त्याने पोलीस पथकाच्या हातून सुटका करून घेत पोबारा केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून वालदेवी नदी परिसरात त्याला पुन्हा ताब्यात घेतले.
बाबासाहेब कपाटे (वय ३०) याने त्याच्या गावातील एका विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून नाशिकरोड येथे आणले होते. गेल्या सहा महिन्यांपासून तो या महिलेला आणि तिच्या दोन मुलांच्या सोबत रा.रमाबाई आंबेडकर नगर, गुलाबवाडी, मालधक्का रोड, देवळाली गाव येथे वास्तव्याला होता. संबंधित महिलेने त्याला अनैतिक संबंधांना नकार दिल्याने बाबासाहेब यांनी तिच्यासह तिच्या मुलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दोन वर्षाच्या शौर्यला सिगारेटचे चटके दिले होते. पीडित महिलेने त्याच्या विरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने बाबासाहेब कपाटे विरोधात बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात त्याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली होती. त्यानंतर त्यास जामीन मिळाला. जामिनावर सुटका झाल्यानंतर कपाटे यांनी पीडित महिलेला पुन्हा धमकावल्याने महिलेने पुन्हा पोलिसांकडे तक्रार केली. यावेळी या महिलेची तक्रार समजून घेत पोलीस उपायुक्त विजय खरात संशयितावर कारवाईचे आदेश दिले होते. पोलिसांनी कपाटे यास गुलाबवाडी भागातून गुरुवारी चार वाजेच्या दरम्यान ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात घेवून येत असतांना अरुंद गल्ल्यांचा गैरफायदा उठवत कपाटे याने पोलिसांना गुंगारा दिला. पोलिसानी त्याचा पाठलाग केला आणि वालदेवी नदी काठी त्याला पुन्हा बेड्या ठोकल्या. त्याच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.