नाशिक : औरंगाबाद रोडवर ग्राहक म्हणून आलेल्या दोघांनी कर्मचारी महिलांचे लक्ष विचलीत करून गल्यातील सुमारे ३६ हजाराची रोकड हातोहात लंपास केल्याची घटना घडली आहे. जगदिश गणपत पेखळे (३८ रा.ओढा,औरंगाबादरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर आडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेखळे यांची ओढा येथे सिध्दी विनायक नावाची गॅस एजन्सी आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास महिला कर्मचारी जयश्री वडजे आणि प्राची नेवडे या एजन्सीच्या ऑफिसमध्ये सेवा बजावत असतांना ही घटना घडली. गॅस शेगडी खरेदी करण्याच्या बहाण्याने ऑफिसमध्ये आलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांना बोलण्यात गुंतविले. यावेळी भामट्यांनी गॅस शेगडीची चौकशी करीत सुट्टे पैश्यांची मागणी केली. त्यानंतर त्यांनी महिलांना बोलण्यात गुंतवून गल्यातील ३६ हजार ६०० रूपयांची रोकड हातोहात लांबविली. अधिक तपास हवालदार भुसारे करीत आहेत.