नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘मला तुझ्यापासून मुलबाळ होऊ दे’, अशा विचित्र मागणी नकार देणा-या विवाहित महिलेसह तिच्या अवघ्या दोन वर्षाच्या चिमुरड्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मुलाला ठिकठीकाणी सिगारेटचे चटके दिल्याचा अमानुष प्रकार देवळाली गाव परिसरात घडला आहे. या संतापजनक घटनेप्रकरणी पीडित विवाहितेने नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर बुधवारी (दि.६) संशयित बाबासाहेब भगवान कपाटे (वय ३०) रा. अंधारी पळशी. ता. सिल्लोड, जि औरंगाबाद हल्ली रा.रमाबाई आंबेडकर नगर, गुलाबवाडी, मालधक्का रोड, देवळाली गाव याच्या विरोधात बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
या अमानुष घटनेतील संशयित बाबासाहेब कपाटे यांनी फिर्यादी विवाहित वीस वर्षीय महिलेकडे ‘मला तुझ्यापासून मुलबाळ होऊ दे’ अशी विचित्र मागणी केली जात होती. संशयिताच्या या मागणीला पीडित विवाहितेने नकार दिल्याच्या रागातून संशयित बाबासाहेब कपाटे याने पीडित महिलेसह तिच्या दोन वर्षाच्या मुलाला हाताचापटीने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याशिवाय मुलगा शौर्य (वय २) याला गेल्या काही दिवसांपासून ठिकठीकाणी सिगारेटचे चटकेही दिले. पीडित महिलेने नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेतल्यावर संशयिताच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस नाईक वाय.डी. देवरे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.