नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील बेडरूममधील लाकडी कपाटातील २ लाख १० हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. आगर टाकळीरोड वरील ड्रीम सिटी शेजारील श्रीकृष्णनगर लेन नंबर २, श्रीहरी बंगला येथे राहणारे सुदेश कृष्ण चहल (वय ५४) यांनी उपनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याच्या बंद दरवाजाचे कडीकोयंडा आणि कुलूप तोडून मागील बेडरूममधील लाकडी कपाटात ठेवलेले २ लाख १० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि.५) सायंकाळी साडेसात वाजता उघडकीस आली. या घरफोडीत १ लाख २० हजार रुपयांचे ४० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या, ४५ हजार रुपये किमतीच्या १५ ग्रॅमची गळ्यातील सोन्याची चेन,१५ हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि ३० हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील रिंगांचे दोन जोड असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. उपनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला असून पोलिस उपनिरीक्षक चौधरी पुढील तपास करीत आहेत.