नाशिक : घरफोडीचा प्रयत्न करणारे दोन जण गजाआड; दळवी कुटुंबियांनी चोरांना पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात
नाशिक : घरफोडीचा प्रयत्न करणा-या दोन जणांना दळवी कुटुंबियांनी पकडून पोलीसांच्या स्वाधिन केले आहे. यातील एक दरोडेखोर मात्र फरार झाला आहे. संजय मुन्ना धोतरे (२२ रा.शनिमंदिराजवळ,फुलेनगर) व जगन काळू गायकवाड (३५ रा.हमालवाडी,पंचवटी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहे. याप्रकरणी महेंद्र प्रभाकर दळवी (४५ रा.चंद्रप्रभा बंगला,हनुमानवाडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. दळवी कुटूंबिय मंगळवारी रात्री झोपी गेले असता ही घटना घडली. तिघा चोरट्यांनी घरफोडी करण्याच्या उद्देशाने बंगल्यात प्रवेश केला. मात्र झोपी गेलेल्या कुटूंबियास याची चाहूल लागल्याने दोघे भामटे जाळय़ात अडकले. कुणी तरी बंगल्यात शिरल्याचे लक्षात येताच कुटूंबियांनी शोध मोहिम राबवित दोघांना पकडले असून त्यांचा एक साथीदार पसार झाला आहे. संशयितांना चोप देवून पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत.
चक्कर येवून पडल्याने ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
नाशिक : हनुमानवाडी भागात राहत्या घरात चक्कर येवून पडल्याने ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बाबुराव जयाजी शिंदे (रा.मैत्रपुष्प अपा.हनुमानवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिंदे सोमवारी रात्री आपल्या राहत्या घरात अचानक चक्कर येवून पडले होते. या घटनेत त्यांच्या डोक्यास मार लागल्याने कुटुंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत.