नाशिकरोड(इंडिया दर्पण वृत्तसेवा)– मद्यपान केलेल्यांना आपण कुठे पडलोय याचेही भान नसते.त्याच्या परिणामाची देखील त्यांना फिकीर नसते. हा निष्काळजीपणा एका मद्यपीच्या जीवावर बेतल्याची दुर्घटना एकलहरे जवळील गंगावाडी शिवारात घडली. अतिमद्यपान करून उघड्यावर उन्हात पडलेल्या बबन दामू दोधाड(वय ३३) या मद्यपी व्यक्तीचा उन्हात भाजून निघाल्याने मृत्यू झाला.ही घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. बबन दोधाड ही व्यक्ती मद्यपान करून गंगावाडी येथील एका शेतात पडून होती. दुपारच्या कडाक्याच्या उन्हाच्या चटक्याने त्याच्या शरीराची एक बाजू भाजून निघाली. उन्हाचा चटका सहन न झालेल्या बबनचा दुर्दैवी मृत्यू झाला. बेशुद्ध अवस्थेत आढळून आलेल्या बबनला स्थानिक नागरिकांनी पालिकेच्या बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉ दिग्विजय पाटील यांनी त्यास तपासून मयत घोषित केले. नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस नाईक एम बी चव्हाण पुढील तपास करीत आहेत.