नाशिक : आगरटाकळी येथे आर्थिक व्यवहारातून पगारे कुटूंबियाने एकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्लाप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात दोन महिलांचा समावेश असून पोलीसांनी संशयितांना अटक केली आहे. रोशन सुनिल पगारे,राकेश सुनिल पगारे,रोहिनी सुनिल पगारे आणि कावेरी सुनिल पगारे (रा.सर्व राजवाडा,आगरटाकळी) अशी कोयत्याने हल्ला करणा-या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी विशाल नारायण कटारे (रा.राजवाडा,आगरटाकळी) यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयित आणि तक्रारदार यांच्यात आर्थिक देवाण घेवाणीतून वाद सुरू आहे. तक्रारदार कटारे हे रविवारी रात्री आपल्या घरासमोर मोबाईलवर बोलत असतांना ही घटना घडली. पाठीमागून आलेल्या टोळक्याने त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. या घटनेत रोशन उर्फ सोन्या याने कोयत्याने वार केला. तर राकेश याने खुर्ची मारून फेकल्याने कटारे जखमी झाले असून याप्रकरणी पोलीसांनी संशयितांना अटक केली आहे. अधिक तपास पोलीस नाईक कोल्हे करीत आहेत.