पंचवटीत सोन्याची पोत ओरबडून नेली
नाशिक – दुचाकी वरुन आलेल्या भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबडून नेल्याची घटना पंचवटीत अमृतधाम परिसरातील लक्ष्मीनगर येथे घडली. पंचवटी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. शनिवारी दुपारी पावणे बाराच्या सुमारास सुमती रामकिसन ठाकरे (वय ६५, शारदा सोसायटी, लक्ष्मीनगर बाफना बाजार जवळ, अमृतधाम) या त्यांच्या घराजवळील दुकानातून सामान घेऊन घरी पायी जात होत्या. त्यावेळेस काळ्या रंगाच्या दुचाकी वरुन आलेल्या दोघा भामट्यांनी त्यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या जवळ दुचाकी थांबविली. त्यानंतर त्यातील पाठीमागे बसलेल्या एकाने महिलेच्या गळ्यातील सुमारे साठ हजाराची सोन्याची पोत ओबरडून नेली.
जेलरोडला सोन्याची पोत ओरबडून नेली
नाशिकरोड – दुचाकीवरून आलेल्या दोघा अनोळखी इसमांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करीत रस्त्याने पायी जात असलेल्या वृद्धेच्या गळ्यातील ७० हजार रुपयांचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे डोरले बळजबरीने खेचून पोबारा केल्याची घटना शनिवारी रात्री सव्वा आठ वाजता जेलरोडला घडली. रजनी वसंत उदावंत (वय ७६) रा त्रिभुवन हौसिंग सोसायटी, लोखंडे मळा, मंगलमूर्ती नगर, जेलरोड यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्या त्यांच्या मुलाच्या घराच्याकडे पायी जात असतांना चंपानगरी गार्डनसमोर त्यांच्या पाठीमागून आलेल्या दोन मोटारसायकलस्वारांनी त्यांना पत्ता विचारण्याचा बहाणा करीत त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे डोरले असलेली पोत बळजबरीने ओढून घेत पोबारा केला. उपनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक गोळे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.