नाशिक : कोनार्क नगर भागात काम करीत असतांना चौथ्या मजल्यावरून पडल्याने ५० वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पंडीत नामदेव लाठे (रा.भाभानगर,हिरावाडी) असे मृत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लाठे शुक्रवारी दुपारच्या सुमारास कोणार्क नगर नंबर २ येथील गणेश मार्केट भागात नव्याने सुरू असलेल्या बहुमजली बांधकाम साईटवर कामकरीत असतांना ही घटना घडली. चौथ्या मजल्यावर काम करीत असतांना अचानक तोल गेल्याने ते जमिनीवर कोसळले होते. या घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाल्याने सहकारींनी त्यांना तातडीने नजीकच्या लोकमान्य हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत डॉ.ओमकार गवळी यांनी खबर दिल्याने पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.